Saturday, June 13, 2020

घटोत्कच : हस्तिनापूरचा वारस


इंद्रप्रस्थ सोडल्यानंतर पांडवांनी जंगलात दिवस काढायचे ठरवले. असेच प्रवास करताना ते एकदा हिडिम्बाच्या जंगलात गेले. दिवसभर प्रवास केल्यामुळे अंधार होताच पांडव झोपी गेले. फक्त भीम मात्र सगळ्यांची रक्षा करण्यासाठी जागा राहिला. त्यावेळी हिडिंबा आणि त्याची बहीण हिडिंबी जवळच्याच गुहेत राहत होते. हिडिम्बाला मानवांचा गंध आला. त्याने आपल्या बहिणीला सांगितले कि "बरेच दिवस झाले आपल्याकडे कोणी मनुष्यप्राणी आला नाही.  यांचा  वास मोहक आहे, आणि माझ्या अंदाजानुसार, हे पाच पुरुष आणि एक स्त्री आहे, त्यापैकी फक्त एक जागा आहे. तू येथे जाऊन त्यांना मोहात पाड आणि मग आपण त्यांची मेजवानी करू”.  हिडिम्बीने  सहज सहमती दर्शविली, आणि ती अप्सरेच्या वेशात पांडवांना पकडण्यासाठी गेली  पण तिथे असलेल्या बलदंड आणि धाडसी भीमाला बघून तिचा विचार बदलला.  तरीही तिच्या अवतारात, ती त्याच्याकडे गेली  आणि त्याला जंगल खूप भयावह असल्यामुळे सोडून जाण्यास सांगितले. पण भीमाने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर हिडिंबेने भीमाला विनंती केली कि मला स्वतःला सुद्धा खूप भीती वाटत आहे त्यामुळे तुम्ही मला माझ्या जागेवर जाण्यास मदत कराल का ? पण भीमाने आपल्या भावांना सोडून तिच्याबरोबर जाण्यास नकार दिला आणि तिला सांगितले कि ज्या पद्धतीने ती एकटीच येथे आली आहे त्याच पद्धतीने ती एकटीच तिच्या घरी जाऊ शकते. हे ऐकून हिडिंबी खूप निराश झाली आणि सरतेशेवटी  तिने स्वतःचे खरे रूप  धारण केले. ते पाहून भीम तिच्यावर चाल करून गेला. तेव्हा हिडिंबे ने त्याला तिच्या भावाबद्दल सांगितले. हे ऐकून भीमाची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्याने हिडिम्बाच्या गुहेवर चाल केली. तुंबळ युद्धानंतर भीमाने त्याचा वध केला. भीमाचे बळ बघून हिडिंबी त्याच्या पूर्णपणे प्रेमात पडली आणि नंतर त्या दोघांनी लग्न केले.

घटोत्कच हा भीम आणि  याच  हिडिंबेचा मुलगा होता. त्याच्या  आईमुळे  तो जन्मतःच राक्षसी शक्ती घेऊन जन्माला आला होता. ज्यामुळे कुरुक्षेत्र युद्धात त्याचा खूप लक्षवेधी सहभाग होता. त्याच्या नावाचे कारणही मोठे मजेशीर आहे. तो जेव्हा जन्माला आला तेव्हा, त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. आणि त्याचे डोके एका घटासारखे होते. म्हणून त्याचे नाव ठेवले गेले घटोत्कच (घट=मडके  +उत्कच=केस नसलेला  )

एके दिवशी हिडिंबीने घटोत्कचला काली  मातेसाठी बलिदान देण्यासाठी माणसाला आणण्यास सांगितले.  बळी देण्यासाठी योग्य माणसाच्या शोधात असतानाच घटोत्कच ला  एक ब्राह्मण आणि त्याची बायको त्यांच्या तीन मुलांसमवेत प्रवास करताना दिसले. घटोत्कच त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्यापैकी एकाला बलिदानासाठी नेण्याची इच्छा व्यक्त केली. प्रथम स्वतः ब्राह्मणाने सांगितले कि तोच बळी म्हणून येईल, त्यानंतर त्याच्या बायकोने स्वतःच्या पती ऐवजी स्वतः बळी जाण्याचे ठरवले. शेवटी त्यांचा दुसरा मुलगा बळी जाण्यास तयार झाला.  पण त्याआधी त्याने प्रथम गंगा नदीत स्नान करण्यास परवानगी मागितली. इतक्यात तिथे भीम आला आणि झाल्या प्रकारची चौकशी केली. तेव्हा भीमाने  त्या ब्राह्मण कुटुंबाऐवजी स्वतः बळी म्हणून येण्याची तयारी दर्शवली. पण त्यासाठी घटोत्कचाने त्याला युद्धात पराभूत करावे हि अट घातली. दोघांच्यात बरेच दिवस घनघोर  शस्त्रविरहित  युद्ध झाले. आणि दोघेही त्यामुळे थकून गेले. त्यानंतर हिडिंबीने घटोत्कचाला भीम हेच त्याचे वडील असल्याचे सांगितले. त्यामुळे युद्ध थांबवून घटोत्कचाने भीमाचे चरणस्पर्श केले आणि भीमानेही त्याचे कौतुक केले. पण त्याच वेळी त्याने दोघांनाही त्यांच्या कृत्याबद्दल समज सुद्धा दिली.

घटोत्कच आणि अभिमन्यू यांच्याबद्दल अजून एक खूप प्रसिद्ध गोष्ट आहे. अभिमन्यू चे लग्न बलरामाची मुलगी वत्सला(ससिरेखा) हिच्या बरोबर ठरले होते. पण जेव्हा अर्जुन वनवासात गेला तेव्हा वत्सला च्या आईने हे लग्न मोडले. तिच्या मते आता अर्जुन  राजकुमार राहिला नसल्यामुळे, अभिमन्यू सुद्धा राज घराण्यातला राहिला नाही. विशेष म्हणजे बलरामाने सुद्धा याला संमत्ती दिली आणि  लग्न मोडले. आणि तिचे लग्न दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण याच्याबरोबर ठरवले. चिडल्येला अभिमन्यूने कृष्णाकडे मदत मागितली, पण कृष्णाने याबाबतीत मदत करण्यास नकार दिला आणि त्याला त्याचा भाऊ घटोत्कचाची मदत घ्यायला सांगितली. घटोत्कचाला हे ऐकून बलरामाचा खूप राग आला. ज्या माणसांनी पांडवांना त्रास दिला त्यांच्याबरोबर बलराम नाते जोडत आहे हे ऐकून त्याला प्रचंड राग आला. यानंतर घटोत्कच वत्सलेचा वेष घेऊन लक्ष्मण च्या लग्नात जातो आणि खऱ्या वत्सलेला पळवून नेतो. आणि अभिमन्यूबरोबर लग्न लावून देतो.

या नंतर घटोत्कचाचा संदर्भ येतो तो महाभारत युद्धात.

महाभारत युद्धाच्या वेळी  भीमाने घटोत्कचाला पांडवांकडून युद्ध करण्यासाठी बोलवून घेतले. आपल्या विशाल शरीरामुळे घटोत्कचाने युद्धभूमीवर हाहाकार माजवला. आपल्या एकाच पायाखाली कितीतरी सैन्यांना तो मारत होता. चौदाव्या दिवशी जयद्रथ मृत झाल्यानंतर युद्ध सूर्यास्तानंतरही चालू राहिले तेव्हा घटोत्कच कौरवांवर तुटून पडला. त्याचा शक्ती पुढे सगळेच हतबल दिसत होते. शेवटी कर्णाला घटोत्कचासमोर यावे लागले. मायावी घटोत्कचाला पराभूत करण्यासाठी कर्णाने आपली स्वर्गीय अस्त्रे मागवली. ते पाहून घटोत्कचाने आपल्या मायावी शक्तीचा वापर करून सगळ्या कौरव सैन्याला राक्षसांनी वेढून टाकले. त्यामुळे जवळ जवळ सर्व राजे आणि त्यांची सेनापती युद्धभूमी सोडून पळून गेले. पण आपल्या अस्त्रावर आणि शक्तीवर विश्वास असलेला कर्ण युद्धभूमीवर टिकून राहिला. पण तरीही तो घटोत्कचाला पराभूत करू शकत नव्हता. नंतर घटोत्कचाने अदृश्य होऊन कौरव सेनेवर लक्षावधी बाण सोडण्यास चालू केले, यामध्ये दुर्योधन स्वतःही जखमी झाला.

कर्ण हे पाहून विचारात पडला. आपल्या कौरव सेनेचा होणारा नाश त्याला सहन झाला नाही, आणि त्याने जी इंद्राकडून मिळालेली  शक्ती( वासवी शक्ती ) अर्जुनावर वापरण्यासाठी ठेवली होती ती घटोत्कचावर वापरली. त्यामुळे घटोत्कचाची राक्षसी शक्ती नष्ट झाली आणि तो जखमी झाला. पण त्या मरणासन्न अवस्थेत ही त्याने आपले शरीर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवले आणि तो लक्षावधी कौरवांच्यावर पडला आणि त्यांना चिरडून टाकले. या नंतर तो स्वर्गवासी झाला.
घाटोत्कचाच्या वधामुळे कृष्णाला एकप्रकारचा आनंद झाला होता कारण जे अस्त्र कर्णाने अर्जुनासाठी जपून ठेवले होते ते इंद्र शक्ती अस्त्र आता त्याला वापरता येणार नव्हते.

घटोत्कचाला युद्धात बोलावून त्याचा वध करवणे यामागे कृष्णाची तल्लख बुद्धी आहे असेही म्हणाले जाते. नियमाप्रमाणे राज्याच्या वारस हा मोठा मुलगा असतो. पांडवांच्या बाबतीत गोष्ट थोडी वेगळी होती. युधिष्ठिराला पुत्र होता प्रतिविंद्या. त्यामुळे साहजिकच प्रतिविंद्या पांडवानंतर हस्तिनापूरच्या वारस होता. पण इथे एक मेख होती. द्रौपदी पांडवांच्या आयुष्यात यायचा आधीच भीम आणि हिडिंबी यांचे लग्न होऊन घाटोत्कचाचा जन्म झाला होता. त्यामुळे एका अर्थी तो पांडवांचा ज्येष्ठ वारस होता. त्यामुळे तर घटोत्कच जीवित राहिला तर नंतर पांडवांच्या वारसा बद्दल मोठी विचित्र परिस्थिती उद्भवली असती. त्यामुळे घटोत्कचाला युद्धात बोलावून त्याचा वध करणे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखे होते, 

घटोत्कचाच्या पत्नी चे नाव होते अहिलावती. जिच्यापासून त्याला बार्बरीका , अंजनपर्वान आणि मेघवर्ण अशी तीन मुले होती. त्यापैकी फक्त अंजनपर्वानं  ने युद्धात भाग घेतला. असे म्हणतात कि तो कुठलेही शिरस्त्राण घालत नव्हता कारण त्याची छाती एवढी बलवान होती कि कुठलाही बाण त्याच्या छातीवर आदळला तर त्याचे तुकडे तुकडे होत असत. याचा वध अश्वत्थामाने केला. बार्बरीका बद्दल असे म्हणले जाते कि तो एवढा बलवान होता कि तो एकटाच सगळ्या कौरवांना पुरून उरला असता. त्यामुळे कृष्णाने त्याला युध्दात भाग घेऊ दिला नाही.

उत्तराखंड मधील चंपावत मध्ये घटोत्कचाचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की जेव्हा कर्णाने त्याचा वध केला तेव्हा याच ठिकाणी त्याचे शीर पडले होते. अशाच प्रकारे हिमाचल प्रदेश मधील मनाली येथे सुद्धा त्याचे मंदिर आहे. त्याच्याच जवळ हिडिम्बादेवीचे मंदिर सुद्धा आहे.