Sunday, May 10, 2020

दुःसाला : कौरवांची एकमेव बहीण


दुःसाला : कौरवांची एकमेव बहीण
------------------------------------

आपण नेहमीच १०० कौरव आणि ५ पांडव  या विषयी बोलतो. पण या कौरवांना एक बहीण होती ज्याविषयी फारशी  माहिती उपलब्ध नाही. कौरवांच्या एकमेव बहिणीचे नाव होतो दुःसाला. दुःसाला हि कौरव आणि पांडवांची सगळ्यात लहान बहीण. त्यामुळे तिच्यावर सगळ्यांचे विशेष प्रेम होते. तिचे लहानपण भीष्मांच्या सानिध्यात गेले  आणि असे म्हणतात कि ती महाभारतामधील सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक होती. दुःसाला चा पती म्हणजे सिंध चा राजा जयद्रथ. ज्याच्या विषयी तुम्ही "हा सूर्य आणि हा जयद्रथ" या प्रसिद्ध गोष्टींमध्ये ऐकले असेल.

खरेतर हे लग्न तसे सुखकर नव्हते. कारण जयद्रथ शूर जरी असला तरी स्त्रियांबद्दल अतिशय लंपट म्हणून प्रसिद्ध होता. याच जयद्रथाने एकदा द्रौपदी चा अपमान केला होता. त्यावेळी अर्जुन आणि भीमाने त्याचा वध करायचा प्रयत्न केला. पण द्रौपदी ने त्या दोघांना थांबवले कारण तिचेही दुःसाला वर प्रेम होते. जयद्रथाला ठार मारले तर दुःसाला विधवा होईल म्हणून तिने याला विरोध केला. पण त्या ऐवजी पांडवांनी त्याचे मुंडन करून परत पाठवून दिले. नंतर युद्धात अर्जुनाने जयद्रथाला कसे मारले हे आपल्याला माहित आहेच.

कुरु युद्धानंतर युधिष्ठरा ने अश्वमेध यद्न केला. त्यावेळी अर्जुन आपला घोडा घेऊन सिंध देशात गेला, तेव्हा तिथे दुःसाला चा पुत्र सुरथा राज्य करत होता. अर्जुन आल्याचे समजताच घाबरून तो मृत्यूशय्येवर पोचला . तेव्हा दुःसाला च्या नातवाने अर्जुनाबरोबर युद्ध करायचा निर्णय घेतला. हे समजल्यावर दुःसाला अर्जुनासमोर गेली आणि तिने अर्जुनाला शांततेचे आवाहन केले. अर्जुनाने हि तिच्या विनंतीचा मान करून सिंध प्रदेशावरचा हक्क सोडून दिला आणि दुःसाला च्या नातवाला सिंध च्या गादीवर बसवले.

केरळ मध्ये आज एक दुर्योधनाचे मंदिर  आहे. जिथे  दुर्योधनाबरोबर दुःसाला ची हीपूजा केली जाते. या मंदिराची कहाणी सुद्धा अतिशय रंजक आहे. असे म्हणतात जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा दुर्योधन त्यांना शोधण्यासाठी पुरोवाझी या ठिकाणी आला होता. खूप शोधल्यानंतर त्याला प्रचंड तहान लागली. तेव्हा एका कमी जातीतल्या कुटुंबातल्या माणसाने त्याची तहान भागवली. तेव्हा  आनंदित होऊन दुर्योधनाने त्याला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या व्यक्तीने तसे करण्यास नकार दिला आणि म्हणाला कि "मी खालच्या जातीतला आहे त्यामुळे मी तुम्हाला अलिगन देऊ शकत नाही" यावर दुर्योधन त्याला म्हणाला कि "व्यक्ती त्याच्या कर्माने लहान किंवा आणि मोठी होत असते. माझे काम पूर्ण झाले कि मी परत येईन आणि तुझा यथोचित सत्कार करेन." दुर्दैवाने दुर्योधनाचा युद्धात भीमाच्या हातून वध झाला. मृत्यूनंतर दुर्योधनाच्या आत्म्याला आपण दिलेले वाचन आठवले आणि तो त्या व्यक्तीच्या स्वप्नात गेला आणि त्याला सांगितले कि मी कायम तुझ्याबरोबर राहीन. सकाळी जेव्हा तो व्यक्ती उठला तेव्हा त्याला अंगणात वडाच्या झाडाखाली एक उजेड दिसला. त्यावेळेपासून तिथेच एक दगड ठेऊन त्याची पूजा केली जाऊ लागली. तेव्हापासून त्याच व्यक्तीचे वंशज इथे दुर्योधन आणि दुःसाला ची पूजा करतात.

No comments:

Post a Comment