Wednesday, May 6, 2020

युयुत्सु : पांडवांच्या बाजूने लढलेला एक कौरव


युयुत्सु
---------
युयुत्सु हे पात्र महाभारतासारख्या धर्मावर आधारलेल्या काव्यामध्ये अतिशय महत्वाचे आहे. धर्मासाठी साठी स्वतःच्या नातलगांच्या विरुद्ध उभे राहणाऱ्या काही पात्रांपैकी एक युयुत्सु.
युयुत्सुचा जन्म मोठ्या विचित्र परिस्थिती मध्ये झाला. आपल्याला हे  माहीत  आहे की गांधारीने शंभर पुत्रांची अपॆक्षा केली होती. परंतु  जेव्हा वर्षे होऊन ही गांधारीआपल्या पुत्रांना जन्म देऊ शकली नाही तेव्हा कंटाळलेल्या किंवा घाबरलेल्या (राज्याला वारस मिळण्याची भीती) धृतराष्ट्राने एका सुगंधा नावाच्या  वैश्य दासी पासून पुत्र प्राप्त केला  ज्याचे नाव होते युयुत्सु. युयुत्सु चा अर्थ आहे सदैव युद्धाला तयार असणारा वीर. आश्चयाची बाब म्हणजे ज्या दिवशी गांधारीला १०० पुत्र प्राप्त झाले त्याच दिवशी युयुत्सु चा जन्म झाला. जरी आपल्याला १०० कौरवांची कथा माहित असेल तरी एकूण कौरव होते १०२. १०० गांधारी पुत्र, युयुत्सु आणि त्यांची बहीण दुःसाला. जिच्या विषयी आपण नंतर जाणून घेऊ.
जेव्हा कौरव पांडव यांच्यात युद्धाची घोषणा झाली, तेव्हा बऱ्याच कौरवांमध्ये गोंधळाची स्थिती  होती. दुर्योधनाचे वागणे बऱ्याच जणांना पटत नव्हते. त्याचे कपट, आणि पांडवांवर होणार अन्याय सगळ्यांना कळत होता. पण कुणीही आपल्या सद्सदविवेकाला जागून याविरोधी भूमिका घेतली नाही. महाभारताचे युद्ध हे धर्म युद्ध असल्यामुळे, कौरव आणि पांडव या दोन्हीपैकी कुणालाही कुठल्याही बाजूने जाण्याचे स्वातंत्र्य दिले गेले, तेव्हा युयुत्सु ने पांडवांची बाजू घेतली.

युयुत्सु ने पांडवांना खूप गुप्त बातम्या पुरवल्या ज्यामुळे पांडवांना मोठी मदत झाली. त्यापैकी सर्वात महत्वाची होती, जी दुर्योधनाने आखली होती. दुर्योधनाने भीमाला पाण्यातून विषप्रयोग करून ठार मारण्याचा गुप्त कट रचला होता. पण युयुत्सु मुळे तो वेळीच पांडवांना कळला आणि भीमाचा जीव वाचला.

कुरु युद्धात प्रचंड प्रमाणावर जीव हत्या झाल्या, युद्धाच्या शेवटी फक्त ११ जण जिवंत राहिले त्यापैकी एक होता युयुत्सु. युद्धानंतर जेव्हा काली युगाचा प्रारंभ झाला तेव्हा पांडवांनी हिमालयाची वाट पकडली. त्याचबरोबर कृष्णानेही हस्तिनापूर सोडले. त्यावेळी अर्जुनाचा नातू परीक्षित याला हस्तिनापूरच्या राजा म्हणून बसवण्यात आले आणि युयुत्सु ला निरीक्षक म्हणून नेमले
युयुत्सु च्या मृत्यू बद्दल काही वाद आहेत. व्यास महाभारताप्रमाणे युयुत्सु वार्ध्यक्याने मृत झाला. पण सरला महाभारतामध्ये एक वेगळी कथा सांगितली आहे. ज्याप्रमाणे युद्धानंतर गांधारी ने सगळ्या पांडवांना भेटण्यासाठी बोलावून घेतले. आणि आपल्या मुलांना बघण्यासाठी डोळ्यावरची पट्टी काढली. तिच्या डोळ्यातील प्रखरतेमुळे युयुत्सु ची राख झाली असाही एक समज आहे.

1 comment: